Questions

सारांशलेखन : [6M]

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 16 Marks
     कोणत्याही अपरिचित माणसाची खाजगी माहिती काढताना आपण त्याचा मित्रपरिवार पाहतो. तो कोणाबरोबर वावरतो यावरून त्याच्या आवडीनिवडींची आपल्याला कल्पना येते. कारण माणूस हा नेहमी त्याच्या संगतीतल्या मित्रपरिवारावरून ओळखला जातो. जीवनात संगतीचे महत्त्व फार आहे. जशी संगत लाभेल, तसे गुण माणसात उतरत असतात. फुलांच्या संगतीने मातीला सुगंध लाभतो, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाला सोन्याची झळाळी प्राप्त होते. मुलांच्या कोवळ्या संस्कारक्षम वयात संगतीला खूप महत्त्व असते. कुसंस्कारित संगत लाभलेली मुलेही वाईट मार्गाला जातात. महात्माजींना जेव्हा वाईट मुलांची संगत लाभली तेव्हा त्यांनी चोरी केली व वडिलमाणसांना फसविले. 'वाल्या' कोळी हा देखील एक दरोडेखोर होता. परंतु नारदमुनींनी त्याचे डोळे उघडल्यावर तो वाल्मिकी ऋषी झाला आणि रामायणाची निर्मिती झाली. 'अंगुलीमाल' नावाचा दरोडेखोर गौतम बुद्धांचे मार्गदर्शन लाभल्यावर अंतर्बाह्य बदलला. पुढे तोच भगवान गौतम बुद्धांचा पट्टशिष्य बनला. नामदेवालाही वाईट संगत लाभली आणि तो दरोडेखोर बनला. परंतु ज्ञानदेवांचा सहवास लाभल्यावर तोच 'संत नामा' झाला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात- 'संग जया जैसा लाभ तया तैसा। होतसे अपैसा अनायासे ।।' असे होऊ नये म्हणून कविश्रेष्ठ मोरोपंत परमेश्वराकडे प्रार्थना करतात- 'सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो।'
Answer
सारांश : माणूस हा नेहमी त्याच्या संगतीतल्या मित्रपरिवारावरून ओळखला जातो. जीवनात संगतीचे महत्त्व फार आहे. जशी संगत लाभेल, तसे गुण माणसात उतरत असतात. मुलांच्या कोवळ्या संस्कारक्षम वयात संगतीला खूप महत्त्व असते. कुसंस्कारित संगत लाभलेली मुले वाईट मार्गाला जातात. म्हणून चांगली संगत लाभणे खूप आवश्यक आहे.
View full question & answer
Question 26 Marks
     ही शाळा तुमची, माझी, आपल्या सर्वांचीच आहे. ती सुंदर, स्वच्छ, प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे नव्हे, तर आपणा सर्वांचेच काम आहे. रोज प्रत्येकाने फक्त दहा मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करुन आपला वर्ग, व्हरांडा, आवार, बसण्याची जागा इत्यादी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, तर एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेची स्वच्छता नजरेत भरण्याइतकी छान होईल. शाळेच्या सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य, प्रसन्न राहील. शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी काय फक्त सेवकांवर टाकायची ? ते बिचारे दिवसभर राबले तरी त्यांचे हात, त्यांची शक्ती तोकडी पडेल. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई करायची आणि इतर हजारो हातांनी मात्र घाण करायची, अस्वच्छता वाढवायची हे योग्य आहे काय ? स्वच्छतेचा वसा घ्या. एकजुटीने कामाला लागा. तरच सुंदर, स्वच्छ शाळेचं स्वप्न सत्यात उतरेल.
Answer
सारांश :शाळा ही आपल्या सर्वांचीच असल्यामुळे ती सुंदर, स्वच्छ व प्रसन्न ठेवणे सर्वांचेच काम आहे. प्रत्येकाने आपल्या आजुबाजुची जागा स्वच्छ ठेवली पाहिजे. एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेतील स्वच्छतेत, सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य, प्रसन्न राहील. शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी फक्त सेवकांची नसून सर्वांची आहे. काही ठराविक लोकांनी स्वच्छता करणे योग्य नाही. सर्वांनी एकजुटीने स्वच्छतेचा वसा घ्या. मगच सुंदर स्वच्छ शाळेचं स्वप्न सत्यात उतरेल.
View full question & answer
Question 36 Marks
     प्रत्येक मानव महत्त्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून त्यात दंग होऊन चालणार नाही ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत. श्रम करण्याची तयारी हवी. श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने माळ घालते. श्रम करणाऱ्याला यशाच्या रूपाने परमेश्वर दर्शन देतो. नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवितो. सतत श्रम करुन प्रचंड कारखान्यांची निर्मिती होते. भव्य मंदिरे, इमारतीची उभारणी होते. डोळ्यांना दिपवून टाकणारी धरणे बांधली जातात. शेतकरी, कामकऱ्यांच्या कष्टातून जीवनाला आकार प्राप्त होतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पूर्ती होते, यशस्वी जीवन जगण्याचा हाच एक मंत्र आहे. प्रत्येकाने मनापासून श्रम केले, तर राष्ट्र उभारणीचे कार्य सफलतेने पार पडेल व राष्ट्र उन्नतीच्या दिशेने वाटचाल करु शकेल.
Answer
सारांश : प्रत्येक माणूस महत्त्वाकांक्षी असतो. तो अनेक स्वप्ने रंगवितो. पण ती साकारण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. श्रम करावे लागतात. श्रम करणाऱ्यालाच लक्ष्मी व परमेश्वराचे दर्शन घडते. परीक्षेतील यश, कारखान्यांची निर्मिती, इमारती, धरणे ही श्रमाचीच निर्मिती आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्यामुळेच जीवनाला आकार प्राप्त होतो. श्रमातूनच अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पूर्ती होते. श्रमामुळेच राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र उन्नतीचे कार्य करता येईल.
View full question & answer