करावे तसे भरावे.
सोनापूर गाव नावाप्रमाणेच सोन्यासारखे सुंदर होते. निसर्गाने जणू काही मुक्त हस्ताने सौंदर्य उधळले होते या गावावर. गावातून एक नदी वाहत होती. याच छोट्याशा गावात रामू नावाच्या एका शिंप्याचे दुकान होते.
गावात एकदा सर्कस आली. सर्कशीतला हत्ती रोज नदीवर स्नानासाठी जाई. जाताना तो शिंप्याच्या दुकानापाशी थांबे. शिंपी त्याला रोज काही ना काही खायला देत असे. मग हत्तीसुद्धा खूश होऊन त्याला सोंडेने सलाम करीत असे.
एके दिवशी, शिंप्याच्या मनात विचार आला की, आपण या हत्तीची गंमत करावी. नेहमीप्रमाणे हत्ती नदीवर जाताना शिंप्याच्या दुकानाजवळ आला. पण आज मात्र खाऊ देण्याऐवजी त्याने हत्तीच्या सोंडेला सुई टोचली. अरेरे! बिचारा हत्ती! वेदनेने कळवळला, पण आपले दुःख बिचाऱ्या मुक्या जनावराला व्यक्त करता येईना. तो तसाच पुढे नदीवर गेला. मनात मात्र शिंप्यावरचा राग धुसफुसत होता. त्यानेही रामूला धडा शिकविण्याचे ठरविले.
आंघोळ करून झाल्यावर हत्तीला युक्ती सुचली. नदीजवळच एक घाणेरड्या पाण्याचे डबके होते. त्याने ते घाणेरडे पाणी आपल्या सोंडेत घेतले व तो शिंप्याच्या दुकानाजवळ परत आला. शिंपी कपड्यांचा पसारा काढून कपडे शिवत बसला होता. त्याने ते सोंडेतले घाणेरडे पाणी शिंप्याच्या दुकानातील सर्व कपड्यांवर उडवले. अशाप्रकारे त्याने शिंप्याला चांगलाच धडा शिकवला.
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.
