आशयसौंदर्य : श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा 'धरिला पंढरीचा चोर' हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त व परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.
काव्यसौंदर्य : श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे आणि त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे, असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा 'छोटा अभंगा 'चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत; शिवाय 'सोहं शब्दाचा मारा केला' यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, ? म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.