कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्या आणि त्या काळात शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग निवडावा लागला. ही शिकवण्याची पद्धत आमच्यासाठी नवीन होती. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटला, पण हळूहळू सवय झाली. मोबाईल, संगणक किंवा टॅबलेटवर आम्ही Zoom, Google Meet, आणि WhatsApp द्वारे वर्ग घेत होतो. शिक्षक व्हिडीओद्वारे शिकवत असत, PPT दाखवत असत, आणि वेळोवेळी प्रश्न विचारून आमचं लक्ष केंद्रित ठेवत असत.
ऑनलाइन शिक्षणामुळे आम्हाला तंत्रज्ञान वापरणं शिकायला मिळालं. घरात बसून शिकता येत असल्यामुळे वेळेची बचत झाली. मात्र कधी-कधी इंटरनेट समस्यांमुळे आवाज नीट ऐकू येत नसे, किंवा वर्गात नेटवर्क बंद पडायचं. वर्गातील गोंगाट, गप्पा आणि थेट शिक्षकांसोबतचं संभाषण मिस व्हायचं.
तरीसुद्धा, अशा कठीण परिस्थितीतही शिक्षण सुरू राहिलं हे महत्त्वाचं. ऑनलाईन शिक्षणामुळे आत्मशिस्त, तांत्रिक ज्ञान आणि जबाबदारी यांचं भान आलं. आता शाळा सुरू झाल्यावर मला दोन्ही शिक्षणपद्धतींचं महत्त्व समजलं. ऑनलाइन शिक्षण हा एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरला.