देवयानी : प्रतिभा, मी आता मोठं काम करणार आहे! आईबाबा मला म्हणाले की, हे बघ, आम्हांला वेळ नाही. तूच काय करायचे ते कर.
प्रतिभा : काय ग, काय करणार आहेस ?
देवयानी : मी आमच्या दारावर मोठी पाटी लावणार 'आमच्या घरात आम्ही कचरा तयार करीत नाही.'
प्रतिभा : आं? म्हणजे काय? करणार आहेस तरी काय ?
देवयानी : मी स्वतः कचऱ्याचे व्यवस्थापन करणार. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणार.
प्रतिभा : ओला कचरा व सुका कचरा म्हणजे काय ?
देवयानी : ओला कचरा म्हणजे कुजणारा कचरा. आपले उष्टे- खरकटे, भाजीपाल्यांचे देठ, उरलेले अन्न वगैरे. सुका कचरा म्हणजे कागद, पुढे, प्लास्टिक, काच, लाकूड असला कचरा. हा वेगवेगळा साठवणार.
प्रतिभा : मग पुढे काय ?
देवयानी : ओला कचरा कुजवण्याची एक टोपली मिळते. त्यात ओला कचरा टाकायचा. त्यावर थोडीशी माती पसरायची. असा दरदिवशीचा कचरा साठवत राहायचे. दोन महिन्यांत ती टोपली भरत येते. तिच्यात टाकलेला कचरा कुजतो. त्याचे खत तयार होते.
प्रतिभा : आणि सुका कचरा ?
देवयानी : तो नीट रचून साठवून ठेवायचा. रद्दीवाले, भंगारवाले यांना महिन्यातून एकदा तो विकायचा.
प्रतिभा : किती छान! म्हणजे घरात कचरा होणार नाही. रस्त्यावर कचरा येणार नाही. झाडलोट करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास होणार नाही. शाब्बास !