वृक्ष म्हणजे निसर्गाचा श्वास, पृथ्वीचं सौंदर्य आणि मानवाचं जीवन. झाडांशिवाय जीवन शक्यच नाही. म्हणूनच वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात, पावसाचं प्रमाण वाढवतं, मातीची धूप थांबवतात आणि तापमान नियंत्रणात ठेवतात. याशिवाय झाडांमुळे छाया, अन्न, औषधं, फळं आणि इंधन मिळतं. एवढंच नव्हे तर अनेक पशुपक्ष्यांचं जीवनही झाडांवरच अवलंबून आहे.
आज जगात वने तोडली जात आहेत, इमारती वाढत आहेत आणि पर्यावरण बिघडतं आहे. त्यामुळे प्रदूषण, पूर, दुष्काळ, तापमान वाढ – हे सर्व गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आमच्या शाळेत दरवर्षी 'वृक्षारोपण दिवस' साजरा केला जातो. आम्ही एकेक झाड लावतो, त्याचं संगोपन करतो. आम्हाला झाडांशी प्रेम वाटायला लागलं आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावलं पाहिजे आणि त्याची काळजी घ्यायला हवी.
वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत. त्यामुळे "झाडे लावा, झाडे जगवा" ही केवळ घोषणा नाही, तर भविष्यासाठीचं वचन आहे.