सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या
पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना 'बिग ५' असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी १०० किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळ्याने झाकून ठेवतो.