वर्षाऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. तापलेल्या मातीवर पावसाचा शिडकावा झाला की मातीचा
सुगंध येतो. सारी सृष्टी न्हाऊन निघते. डोंगरदऱ्यांत पाणी खळाळते. झाडे अंघोळ करून स्वच्छ होतात. नदीनाले भरभरून वाहू लागतात. गुरेढोरे, पशुपक्षी यांना पाणी मिळते. शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात. मुले आनंदाने बागडतात. सर्वत्र हिरवेगार होते. सृष्टी आपले रूप पालटते. चराचरावर आनंदाची लकेर घुमते, कवी, लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात. खरेच! पाऊस हा नवसर्जनाचा ऋतू आहे!