पुढील कृतीनुसार कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा :
पुढील कृतीनुसार कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा :
(१) मागणीपत्र :
दिनांक : २५ ऑक्टोबर २०२२
प्रति,
मा. व्यवस्थापक,
सरगम संस्था,
अमरावती - ४४४ ६०१,
विषय: 'दिवाळी पहाट' हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजीसुद्धा पहाटे सादर करण्याबाबत.
महोदय,
सर्वप्रथम आपले व आपल्या संस्थेतील अन्य सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. कौस्तुभ व सोनाली माडे हे नव्या पिढीतील दमदार गायक आहेत. त्यांच्या सुरेल व बहारदार गायनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलात. आम्हां अमरावतीकरांसाठी ही सुवर्णमेजवानी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हॉलवरच सर्व तिकिटे संपली.
एरवी ही अत्यंत आनंदाची असलेली गोष्ट माझ्यासारख्या शेकडो लोकांसाठी खूप निराशेची ठरली आहे. मला असे कळले आहे की, तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या दिवशी शेकडो लोक हॉलवर आले होते. पण त्यांना तिकीट मिळाले नाही. मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. तिकीट विक्रीच्या तिसऱ्या दिवशी मी आलो. मलाही तिकीट मिळाले नाही. माझी आपल्याला कळकळीची विनंती की, आपण हाच कार्यक्रम ३ नोव्हेंबर किंवा ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा सादर करावा. त्यामुळे शेकडो
निराश लोक आनंदित होतील. त्वरेने निर्णय घेऊन तिकीट विक्री सुरू करावी, ही विनंती.
कळावे
आपला नम्र,
वैभव सातोस्कर
१९३०, शनिवार पेठ,
उभ्या मास्तीजवळ,
अमरावती-४४४ ६०१.
ई-मेल: vas@xxxx.com
(२) तक्रारपत्र :
दिनांक: २३ ऑक्टोबर २०२२
प्रति,
मा. व्यवस्थापक,
सरगम संस्था,
अमरावती ४४४ ६०१.
विषय: घरपोच तिकीट न मिळाल्याबद्दल.
महोदय,
मी दुःखी मनाने आपल्याकडे माझी तक्रार नोंदवत आहे. आपण कौस्तुभ व सोनाली माडे यांच्या सुरेल व बहारदार गायनाचा कार्यक्रम आयोजित केलात, त्यामुळे आम्ही खुशीत होतो. तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी मला हॉलवर जाणे शक्य नव्हते. म्हणून आपण दिलेल्या फोनवर घरपोच तिकिटांची मागणी नोंदवली. 'घरपोच तिकिटांची सोय' असे आपण जाहीर केले होते. मी अगदी वेळेतच माझी मागणी नोंदवली होती. प्रत्यक्षात मात्र हॉलवरच सर्व तिकिटे विकण्यात आल्याचे कळले. हे अत्यंत अयोग्य होते. आपण याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असे मी आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.
कळावे,
आपला नम्र,
मधू कोलाबकर
१०, पंचगंगा, ब्रह्मपुरा,
अमरावती ४४४ ६०१.
ई-मेल: mak@xxxx.com
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.