Question
नागरीकरणाचे फायदे सांगा.

Answer

नागरीकरणाचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) सामाजिक एकोपा : नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशांचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो.
(२) आधुनिकीकरण : विविध प्रदेशांतून लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होते. अद्ययावत माहिती, तसेच साहित्य यांचा लाभसर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसाय संदर्भाने अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशात विकसित होताना दिसतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधांचा फायदा प्रथम मिळतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो.
(३) सोईसुविधा : नागरीकरणामुळे नागरी वस्तीमध्ये अनेक सोईसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैदयकीय, अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
(४) वाहतुकीच्या सोई : चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. यांचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो.
(५) शिक्षणाच्या सोयी : शिक्षणाच्या सेवादेखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षण या संदर्भाने सेवांचा फायदा घेण्यासाठी इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात.
(६) वैद्यकीय सोयी : वैदयकीय सोयीदेखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयींचा लाभ घेण्यासाठी इतर भागांतून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यासाठी येतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free