(१) सागरजलाच्या तापमानाचा अभ्यास हा पृष्ठीय तापमान आणि खोलीनुसार तापमान अशा दोन्ही प्रकारे करावा लागतो.
(२) सागरजलाचे पृष्ठीय तापमान हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे अक्षवृत्तानुसार कमी कमी होत जाते. विषुववृत्ताजवळ सागराचे पृष्ठीय तापमान २५° से असते, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६° से तर ध्रुवाजवळ २° से आढळून येते. सागराचे स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादी विविध घटक सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर परिणाम करतात.
(३) सागरजलाच्या पृष्ठीय तापमानाच्या तुलनेत खोलीनुसार होणारा बदल वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्रसपाटीपासून जसजसे खोल जावे, तसतसे सागरजलाचे तापमान कमी कमी होत जाते. मात्र, खोलीनुसार तापमान कमी होण्याचे हे प्रमाण पृथ्वीवर सर्वत्र सारखे नसते.
(४) विषुववृत्ताजवळ खोलीनुसार तापमानात पडणारा फरक हा सर्वाधिक असतो. विषुववृत्ताजवळ सागराचे पृष्ठीय तापमान १८ ते २५°से असते, ५०० मीटर खोलीवर ते १२° से असते, १००० मीटर खोलीवर ते ८° से, तर १५०० मीटर खोलीवर ते ५° से असते. २००० मीटर खोलीवर सागरजलाचे तापमान ४° से आढळते. थोडक्यात, पृष्ठीय भाग ते २००० मीटर खोलीवर विषुववृत्ताजवळ तापमानातील बदल हा १८° से ते ४° से इतका असतो. मध्य अक्षवृत्तावर मात्र हाच बदल १४° से ते ४° से इतका असतो. ध्रुवीय प्रदेशात पृष्ठीय आणि खोलवर तापमान सर्वत्र सारखे म्हणजे ४°से असते. सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन होते. काही प्रमाणात सूर्यकिरणे एका ठरावीक खोलीपर्यंतच पोहोचतात. मात्र त्यांची तीव्रता कमी असते. त्यामुळे २००० मी खोलीनंतर सागरजलाच्या तापमानावर सूर्यकिरणांचा काहीही प्रभाव पडत नाही आणि पृथ्वीवर सर्वत्र ते ४° से इतके स्थिर झालेले दिसून येते.