ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे :
(अ) उद्रेकानुसार वर्गीकरण: उद्रेकानुसार ज्वालामुखींचे पुढील दोन प्रकार पडतात :
(१) केंद्रीय ज्वालामुखी : (१) ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लाव्हारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.
(२) ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नलिकेच्या मुखाभोवती पसरतात.
(३) केंद्रीय ज्वालामुखींमुळे शंकूंच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात.
(४) उदा., जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो पर्वत.
(२) भेगीय ज्वालामुखी : (१) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळी एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगांतून बाहेर पडतो. याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात.
(२) ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात.
(३) भेगीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
(४) उदा., महाराष्ट्रातील दख्खनचे पठार.
(ब) उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण : उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील तीन प्रकार पडतात :
(१) जागृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
(२) सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी : जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदा., इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.
(३) मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदा., टांझानियातील किलीमांजारो.