भूकंप लहरींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(१) प्राथमिक भूकंप लहरी : (१) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना प्राथमिक किंवा 'P' भूकंप लहरी म्हणतात.
(२) प्राथमिक भूकंप लहरी या भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात.
(३) या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात.
(४) या लहरींच्या मार्गातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात.
(५) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात. मात्र द्रवस्वरूपातील गाभ्यातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.
(२) दुय्यम लहरी : (१) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा 's' लहरी म्हटले जाते.
(२) या लहरी नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.
(३) या लहरी फक्त घन पदार्थांतून प्रवास करतात. मात्र द्रव पदार्थांतून प्रवास करताना त्या शोषल्या जातात.
(४) पदार्थांतील कणांची हालचाल या लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते.
(५) त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती वर-खाली हलतात.
(६) प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.
(३) भूपृष्ठ लहरी : (१) प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्यकेंद्रावर येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी, म्हणजे भूपृष्ठ लहरी होत.
(२) या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात.
(३) त्या अतिशय विनाशकारी असतात.